भारतीय नौदल दिन




भारतीय नौदल दिन प्रत्येक वर्ष 4 डिसेंबरला साजरा केला जातो. भारतीय नौदलाने देशाच्या हितासाठी केलेल्या कामगिरी आणि त्यांच्या योगदानाला सलाम करण्याचा हा दिवस असतो. त्याचप्रमाणे प्रत्येक भारतीय नागरिकांना भारतीय नौदलाबद्दल जाणीव करून देण्यासाठी हा दिवस मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो.
भारतीय नौदलाचा स्थापना दिवस हा 26 जानेवारी 1950 होता. पण 4 डिसेंबर 1971 ला भारतीय नौदलाने लढलेल्या एका युद्धाच्या स्मरणार्थ 4 डिसेंबर हा दिवस भारतीय नौदल दिन म्हणून साजरा केला जातो. ते युद्ध म्हणजे भारत- पाकिस्तान युद्ध होते. या युद्धात भारतीय नौदलाने पाकिस्तानी नौदलावर जबरदस्त हल्ला केला होता. या युद्धात भारतीय नौदलाने पाकिस्तानच्या कराची बंदराला आपल्या ताब्यात घेतले होते आणि त्या युद्धात पाकिस्तानचे पाणबुडी, युद्धनौका, विध्वंसक अशा अनेक युद्ध साहित्याचा नाश केला होता. त्याच युध्दाचा गौरव म्हणून 4 डिसेंबर हा दिवस भारतीय नौदल दिन म्हणून साजरा करण्यात येतो.
या दिवशी भारतीय नौदलाचे अनेक कार्यक्रम आयोजित केले जातात. या कार्यक्रमामध्ये नौदल प्रशिक्षण केंद्रातून भारतीय नौदलाविषयी छायाचित्र प्रदर्शन आयोजित केले जाते. या प्रदर्शनामध्ये भारतीय नौदलाच्या इतिहासाबद्दल आणि त्यांच्या कार्याबद्दल माहिती दिली जाते. त्याचप्रमाणे अनेक शहरांमध्ये नौदल म्युझियम आहेत, त्या म्युझियममध्ये जाऊन भारतीय नौदलाच्या कार्याबद्दल अधिकाधिक माहिती मिळवता येते.
या दिवशी भारताचे राष्ट्रपती आणि पंतप्रधान देशातील सर्व नागरिकांना आणि विशेष करून भारतीय नौदलाच्या सर्व जवानांना आदरपूर्वक नौदल दिन शुभेच्छा देतात. त्याचप्रमाणे काही ठिकाणी नौदलाचे बँड तयार करून त्यातून मार्च पास्ट करण्यात येतो. अनेक शहरांमध्ये नौका दौडी स्पर्धा आणि जलतरण करण्याच्या स्पर्धा आयोजित केल्या जातात.